जामनेरात गुटख्याची सर्रास विक्री
राज्यात गुटखा बंदी असतांना मात्र जामनेर शहरात गुटख्याची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. याकडे अन्न प्रशासन कमालीची डोळेझाक करीत असुन पान टपरी, ठेले, किराणा दुकान यांसारख्या ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री होतांना दिसत आहे. अन्न प्रशासनाचे अधिकारी यांना हा प्रकार दिसत नव्हे का विभागाचे अधिकारी करतात तरी काय? असा सवाल केला जात आहे. शहरात कुठुन तरी सुगंधी तंबाखू, पानमसाला, सुपारी, गुटखा येत आहे. शहरातील काही गोळ्या, बिस्किटे, कुरकुरे या होलसेल दुकानातुन हा माल प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानात पद्धतशीरपणे पोहचविल्या जातो. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गुटखा माफियांची हिंमत वाढली आहे. या धंद्यात काही सामाजिक व युवक संघटनेचे पदाधिकारी हे सहभागी असुन समाजात मोठ्या तोर्यात वावरत आहेत. तर अधिकार्यां सोबत फोटोसेसन करुन त्या आड जोमाने गुटखा व्यवसाय चालवित आहेत. त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन सर्वसामान्यांवर छाप पाडण्याचा प्रकार राबवित आहेत. महिन्याकाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याने कित्येकांनी यातुन आपले उखळ पांढरे केले आहे. पोलीस प्रशासन सुद्धा अनेक वेळा कारवाई करते. मात्र सोडून दिल्या नंतर "येरे माझ्या मागल्या" प्रमाणे पुन्हा या धंद्यात माफीया पाय घट्ट रोवतात. गुटखा माफियां विरुद्ध ठोस अशी भुमिका कोणी घेत नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, लहान मोठे दुकानात, पानटपरी या ठिकाणी विविध प्रकारचा गुटखा सहजरीत्या मिळतो. गुटखा, खर्रा, तंबाखू खाऊन देशाची भावी पिढी गारद होऊन व्यसनाधीन झाली आहे. अल्पवयीन मुले आहारी गेले तर व २० ते ३० वयोगटातील युवकांना याची सवय होऊन कित्येकांना तोंडाचा व जिभेचा कर्करोग होऊन अनेक तरुणांना तरुणपणी आपला जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी जर नजर टाकली तर गुटख्याच्या थुंकीच्या पिचकारीने रंगरंगोटी केलेली पहायला मिळेल. शासकीय कार्यालयातील काने कोपरे सुद्धा या गुटखा प्रेमींनी सोडली नाहीत. "जिकडे तिकडे चोहीकडे मुबलक गुटखा मिळे" अशी अवस्था सार्वजनिक ठिकाणांची झालेली आहे. हा गुटखा खाण्यासाठी योग्य आहे की नाही? याची रीतसर तपासणी कोणीही करीत नाही. जर आपल्याला आपल्या देशाची पिढी व तरुण खरेचं टिकवायची असेल तर अशा व्यसनातुन तरुणांची सुटका वेळीच व्हायला हवी. विक्रीसाठी आलेला गुटखा खरा की बनावट याची खात्री न करताच गुटखा शौकिन याचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात व आपले जीवन धोक्यात घालतात. किंवा जिवानिशी जाऊन आपले कुटुंब व संसार उघडय़ावर सोडून जातात. या होणाऱ्या गुटख्याच्या खुलेआम विक्रीला कायमस्वरूपी हद्दपार करावी. असा सुर सुज्ञ नागरिकां मधुन निघत आहे.
Comments
Post a Comment